निदान आई तरी म्हण...

"आई का ग मला सोडून गेलीस? आपल्या मुलाला शेवटच पाहव असही नाही का ग वाटल तुला? अशी कशी गेलीस ग मला पोरक करून" सौरभ हुंदके देत देतच समोर ठेवलेल्या आणि निपचित पडलेल्या आईच्या मृत देहाकडे पाहून प्रश्न विचारत होता.


सौरभचे बाबा तर निशब्द झाले होते. त्यांच्या डोळ्यातून फक्त एकसारखे अश्रू ओघळत होते.
आपल्या मुलाने फोडलेल्या हंबरड्याने एवढा वेळ शांत असलेले बाबा त्याला आपल्या मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होते.......पण सौरभला काहीच समजत नव्हते,  तो अजुनही मानायला तयार नव्हता की त्याची आई त्याला सोडून देवाघरी गेली आहे.

पण म्हणतात ना नशीबापुढे कोणाच काही चालत  नाही. तसच काहीस झालेल....बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याच निम्मित झाल नि त्याच्या आईच्या मेंदूला मुक्का मार बसला.....डाॅक्टरांनी आॅपरेशन केल पण ऊपयोग झाला नाही....त्याच्या आईला हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट केल्यावरतीच डाॅक्टरांनी सांगितल होत परिस्थिती गंभीर आहे; परंतु बाबांनी सौरभला सांगितल नव्हत कारण त्याची परीक्षा चालू होती.....तो हाॅस्टेलवर राहत होता....ईकडे सौरभची परीक्षा संपायला आणि दुसरीकडे त्याच्या आईच आयुष्य संपायला.

आई जावून पाच-सहा दिवस झाले होते....सौरभचे जवळचे नातेवाईक, त्याची आत्या, मामी ही निघून गेले....आता घरात ऊरले फक्त सौरभ आणि त्याचे बाबा. सौरभला घरातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून आईचा आणि त्याचा संवाद ऐकू आल्याचा भास व्हायचा....."ए आई काय ग कितीवेळ झाल काम चाललय तुझ? ये ना बस जरा माझ्याजवळ...."  "ए आई मस्त एक चहाचा कप बनव ना...तू नेहमी बनवतेस तसा" "आई, ए आई ऐकलस का माझा टाॅवेल सापडत नाहीए....कुठ ठेवतीस काय माहीत...रोज एक जागा असतो तुझा...."  "आई लव्ह यु......यु आर बेस्ट पर्सन इन दिस् वर्ल्ड...." "अशी कशी ग तु विसरभोळी आई....काल तर मी सांगितलेल तुला याविषयी..." "ए आई माझ्या केसांची मालीश करून देना जरा..." "बाबा तुम्हीपण जरा मदत करू लागत जा माझ्या आईला.." "आई दे ना ग , एक-एकच चपाती बनवतो...तु बघच कशी फुगतेय ती" अशी एक ना अनेक वाक्ये सौरभच्या डोक्यात घुमायची नि शेवटी अश्रू बणून डोळ्यातून बाहेर पडायची....

सौरभ मनातूनच म्हणायचा "आई रेअली आय मिस यू...तू करतेस का ग मला मिस..." अस म्हणताच जणू आईच्या फोटोतून त्याला आवाज यायचा "होय माझ्या सौरभ बाळा मिस यू टू" आणि तो हे बाबांना फोटोकडे हात दाखवून सांगायचा बघा बाबा आई बोलतेय माझ्याशी.....बाबांना आपल्या मुलाचा हा आकांत सहन होत नव्हता, शेवटी ते आजारी पडले....बाबांची ही स्थिती पाहून सौरभ काळजीत पडला....त्याला कळून चुकल की बाबा माझ्या काळजीने आजारी पडल्यात....
त्याने आत्या व मामा ला फोन करून सांगितल असता, त्याला सगळेजण बोलले आपण तुझ्या बाबांच दुसर लग्न करूयात. घराला बाईशिवाय घरपण नाही.....सौरभ मॅच्युअर होता. जर घरात नवीन सदस्य येण्याने आपले घर पूर्ववत होणार असेल, बाबांची तब्येत नीट होणार असेल तर ठीक आहे, करूया बाबांच लग्न अस तो मामाला सांगतो....बाबा लग्नाला अजिबात तयार नव्हते....त्यांच्या मते माझ्या सौरभच्या आईची जागा घेणार कोणी नको आहे घरात.....पण सौरभ ऐकत नाही, त्याच म्हणन होत ऊद्या मी डिग्री पूर्ण करण्यासाठी हाॅस्टेलला जाणार, मग मागे बाबांची काळजी कोण घेणार....मी नसताना तर त्यांना घर खायला ऊठेल.

सौरभच्या आग्रहापूढे त्याच्या बाबांच काहीच चालत नाही. शेवटी त्यांच लग्न होत आणि एक नवीन सदस्य घरी येतो....ती त्याच्या मामीची चूलत बहिण होती. जिने आध्यात्मात स्वतला झोकून दिल होत...त्यातच तिच वय झाल आणि लग्न राहून गेल होत...पण आज सौरभमुळे तिलाही एक पत्नीच आयुष्य जगता येणार होत....तीच नाव निर्मला....नावाप्रमाणेच ती निर्मळ मनाची होती. घरात प्रवेश केल्यापासूनच ती मनातून सौरभ बद्दल कृतज्ञ होती की सौरभच्या आग्रहामुळे, त्याच्या बाबांनी माझ्याशी लग्न केल आणि आपल्याला संसाराच भाग्य  लाभल.

निर्मलाताईंनी पूर्णपणे घराला आपल मानल होत.....ज्याप्रमाणे सौरभची आई सगळ घर सांभाळायची अगदी तसच.....सौरभची तर खूप काळजी घ्यायच्या. त्याला काय आवडत काही नाही आवडत हे सगळ त्या सौरभच्या बाबांना विचारून घ्यायच्या....निर्मला आपल्या मुलाची एवढी काळजी घेतोय हे पाहून त्याच्या बाबांनाही मनातुन बर वाटायच....हळूहळू ते आजारातून बाहेर पडले व एकदम बरे झाले......आपल्या बाबांची ठीक झालेली तब्येत पाहून सौरभलाही निर्मलाताईंविषयीचा आपला निर्णय योग्य ठरला अस वाटायच.....तोही निर्मलाताईंशी बोलायचा पण जेव्हड्यास तेवढच आणि तेही अहो-जावो....तो त्यांना आई म्हणून कधीच हाक मारायचा नाही....जे काय हव असेल अथवा काही बोलायच असेल ते "अहो मला जरा चहा देता का?" "अहो मला आज भूक नाही माझ जेवण बनवू नकात" "अहो बाहेरून काही आणायच असेल तर सांगा, मी बाहेर चाललोय" "अहो भाजी जरा तिखट झालेय" "अहो मला जरा जेवायला वाढता का?" तो काकू किंवा अन्य कोणता शब्दही वापरत नव्हता माञ नम्रपणे बोलायचा अगदी त्यांना आदराने वागवायचा फक्त तो स्वतच्या आईची जागा त्यांना देऊ शकत नव्हता.

निर्मलाताईंनाही या गोष्टीच वाईट वाटायच की सौरभ त्यांना आई म्हणायचा नाही....त्याच्या बाबांनाही निर्मलाताईंच दुख दिसायच पण ते काहीच करू शकत नव्हते....कारण कोणतही नात जबरदस्तीने लादता येत नाही हे ते जाणून होते.....एव्हाना निर्मलाताईंच्या मनातील सल सौरभलाही कळाली होती....कारण तो खुप हळवा होता पण एवढ्या सहजासहजी तो आपल्या आईचा दर्जा निर्मलाताईंना देऊ शकत नव्हता...

बघता-बघता वर्ष संपल.....चार दिवसांनी सौरभच्या आईच वर्षश्राद्ध होत.....सौरभच्या काॅलेजलाही महिनाभर सुट्टी लागली होती. तो घरी आला होता....यावेळी त्याला घर वेगळच भासत होत...जणू निर्मलाताई त्याचीच आई आहे....आणी आपली आई देवाघरी गेलीच नाही....कदाचित त्या घराला, घरातल्या प्रत्येक वस्तूलाच आता निर्मलाताईंची सवय झाली होती. वषश्राद्धाची पूर्ण तयारी निर्मलाताईंनी एकटीनेच केली होती....त्याचे बाबा आॅफिसच्या कामानिम्मीत बाहेरगावी गेले होते आणि ते डायरेक्ट त्याच दिवशी परतणार होते.....सौरभने निर्मलाताईंना विचारल "अहो काही तयारी राहिली असेल तर सांगा मी करतो" त्यावर निर्मलाताई "तु निश्चिंत रहा मी सर्व तयारी केली आहे " म्हटल्या...

सौरभ पाहत होता निर्मलाताई किती मनापासून सर्व काही करत होत्या......त्याच्या आईचा फोटो तर भिंतीला लावल्यापासून क्वचितच सौरभने पुसला असेल नाहीतर निर्मलाताईच स्वच्छ करायच्या. सौरभला कधीकधी मनातून वाईट वाटायच की खरच आपल काही चुकत तर नाही ना? आपण त्यांना आई म्हणत नाही त्यांना वाईट वाटत त्याच......तो निर्मलाताईंकडे गेला व त्यांना त्याच्या मनातील व्यथा सांगितली असता निर्मलाताई "मला माहीत आहे रे तुझा स्वभाव....तु एवढा विचार नको करूस...तुझ्या जागी मी असते तरी अशीच वागले असते...तुझ्या मनाचा मोठेपणा की तु माझ्याजवळ मनमोकळ केलस...पण एक ऊपाय सांगू यावर"

"हो सांगा ना ...मी ऐकेन" सौरभ

"मला तु 'अहो' म्हण पण निदान 'आई' तरी म्हण....म्हणजे मलाही आई बनल्याच भाग्य लाभेल.."

"आणि मला माझ मन हलकं झाल्यासारख वाटेल" अस म्हणून तो निर्मलाताईंच्या पाया पडतो आणि  "आई मला आशीर्वाद द्या" म्हणतो.....व सौरभच्या मनातील ''ए आई'' ची जागा ''अहो आई" घेते.....समाप्त.

प्रिय वाचकहो....तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...हो आणि अशाच कथा, लेख वाचण्यासाठी माझ्या 'रंग आयुष्याचे' या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा.

©माधुरी सोनवलकर-पाटील(सांगली)

फोटो_साभार_गुगल

All copyrights are reserved.

Post a comment

0 Comments