मायेची हळुवार फुंकर...


"आई ग....लागल" म्हणून मी थोडीशी व्हिवळले...आणि किचन मधूृन  बाहेर येऊन ओट्यावर ऊभा राहिले. हाताच्या अंगठ्याला कांदा कापत असताना चाकू कापला होता.....मला काहीच सुचल नाही, डोळ्यासमोर अंगठ्यातून येणार रक्त येऊन अंगठा अक्षरश: ठसठस करत होता....मला एकदम गुदमरल्यासारख होऊन घामच आला...मी थेट अंगठा बेसीनमध्ये पकडला नी वरून पाणी सोडल....किचनच्या मागच्या दरजाने बाहेर ओट्यावर  जरा हवेला आले....बाहेर झाड आहेत नी त्यात वाराही होता. मटकन मांडी घालून हाताचा अंगठा पुढे घेऊन बसले....पूर्ण शरीराला जरी वारा लागत असला तरी अंगठा माञ ठणका मारत होता.....चेहरा अगदी रडवेला करून बसले होते मी.

अस मुळीच नाही की याअगोदर कधी अस झालच नव्हत....लग्न होण्याअगोदर तर भरपूर वेळा लागल होत अस मला...
बहिणाबाई म्हणतातच ना,

"अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके मग मिळते भाकर"

ऊगीच शुन्यात नजर लावून, रडवेली होउन बसले होते.....आणि तेव्हढ्यात माझ पिल्लू, माझी मुलगी मला पाहून "मम्मा, मम्मा" करत जवळ आली....मी हातात अंगठा पकडलेला आणि तोंड तर पडलेलच होत...ते पाहून ग माझ्या पिलूने माझ्या तोंडावर हात फिरवला....मला आतून एवढ गदगदून आल...डोळे गच्च भरले.....माझ्या पिलूचा माझ्या गालावरून फिरत असलेला हात मला बर्फासारखा भासला....अंगठ्याची ठणठण एका क्षणात थांबली.....तिची माझ्याप्रती ही काळजी मला आणखी हवी होती...म्हणून मी मग ऊगच थोड रडायच नाटक केल तस माझ पिल्लू "मम्मा दिया हाय, दिया हाय ना" अस म्हणून माझ्या हातावर फुंकर मारू लागलं.......तेव्हा कृतकृत्य झाला माझ्या मातृत्त्वाचा प्रवास.....या मायेने घातलेल्या हळुवार फुंकरीत कुठल्याही औषधापेक्षा कितीतरी पट अधिक जखम बरी करण्याची शक्ती होती.

माझ्या मुलीला मी जवळ घेऊन तीची एक पापी घेतली....एवढासा जीव तो, नीट बोलताही येत नाही, तरीही आज माझी आई झालेला....आणि माझ्या जखमेवर प्रेमाची फुंकर घालत होता.....म्हणतात म्हातारपणी आपली लेकच आपली आई बनते.....पण इथ तर माझी मुलगी आत्ताच माझी आई झाली आहे.

बर ती एवढ्यावरच थांबली नाही.....तर किचनमध्ये जाऊन तिने मसाला डबा आणला....ज्यात सहा कप्पे असून हळद, जिरे, मोहरी, ओवा, वेलची, हिंग असे फोडणीचे पदार्थ असतात....."मम्मा लावा ना" अस म्हणून तीने हळदीकडे बोट दाखवल....कारण एक पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा तिच्या पायाला ठेस लागली होती तेव्हा मी  त्याठिकाणी हळद भरली होती. ते तिच्या लक्षात असाव....मी  लगेच हळद लावली अंगठ्याला...माझ दुखण तर कुठच्या कुठ पळाल होत....कारण माझ्या घरीच माया लावून ऊपचार करणारा डाॅक्टर होता.

या सगळ्यात मला वाईट वाटल ते याच की एरवी माझी मुलगी सारख मसाल्याचा डबा घेऊन मोहरीच्या कप्प्यातली मोहरी जिर्‍याच्या कप्प्यात तर ओवा  वेलचीत अस चमच्याने मिक्स करत बसून खेळत बसायची म्हणून मी तिला ओरडायचे.....तरीही माझ पिल्लू किचनमध्येच माझ्या आजुबाजूला लूडबूड करत बसायच....आणि आज त्यामुळेच तिला मसाल्याचा डबाही माहित होता आणि हळदही !

मी इकडे हळद लावून ऊठेपर्यंत तीने मम्माला बाऊ झालाय म्हणूनन पप्पांना बोलावून आणल.....मग काय पोरगी ती पोरगी आणि वरून नवरा. प्रेमाचा आणि काळजीचा वर्षावच वर्षाव. नवर्‍याच सुरू झाल, "ग सावकाश करत जा, घाई करून आपल्याला कुठे जायचय, आणि काम राहिल तर राहिल पहिला स्वतची काळजी घ्यायची.....चल पट्टी करून देतो" म्हणून नवर्‍याने पट्टी करून दिली....आणि कांदाही कापून दिला.

वाह ! माझी मुलगी आणि नवरा अशीच जर माझी काळजी घेणार असतील तर पुढे जाउन काहीही संकट आल तरी मला टेंन्शन घ्यायची गरजच काय...अस मी मनात म्हणतेय नाही तोवर नवरोबाने भाजी बनवायला घेतली नी एका बाजूला चहा टाकला.....मुलीने ढकलत ढकलत खूर्ची ओढून बसायला सांगितल....आणि बसली पप्पाच्या आजुबाजूला लुडबूड करत. मी ऊगीच आपल त्या दोघांकडे बघत मनातुन खुष होत होते आणि देवाचे मनापासून आभार मानत होते अशी गुणी मुलगी नी नवरा भेटला म्हणून.

प्रिय वाचकहो, चला तर मग शेअर करा तुमचा पहिलावहिला अनुभव जेव्हा तुम्हाला काहीतरी लागलं होत किंवा जखम झाली होती...आणि तुमच्या प्रियजनांनी कशी तुमची काळजी घेतली होती...

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल


Post a comment

0 Comments