खात्या-पित्याची घरची मुलं....             सकाळची वेळ. सानवी स्वयंपाक करत होती. तिच्या सासुबाई विमलाकाकूंची देवपूजा चालू होती. देवपूजा झाली नी त्यांच तणतण करण सुरूच झाल. "काय बाई या आजकालच्या कामवाल्या बायका अजिबात वेळेवर येत नाहीत. डोक्यावरच बसतात....त्यांना अस वाटत की आपल्याला त्यांची गरज नाही, त्यांना आपली गरज आहे."
सानवी "अहो आई (सासू) येतील की राधाकाकू. काहीतरी काम लागल असेल त्यांना नाहीतरी एरवी कधी एवढा ऊशीर नाही होत त्यांना."

विमलाकाकू "हो हो सानवी तुझ्या अश्या वागण्याने ती जास्तच डोक्यावर बसतेय, तूच लाडवून ठेवलयस तिला."

सानवी "बिचार्‍या काकू भोळ्या आहेत पण प्रामाणिक आहे. एकतर त्यांचा नवरा दारूडा. एकट्याच काम करून पोरांना जगवत आहेत."

विमलाकाकूंवर सानवीच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही. त्यांच तणतण चालूच असत.

सानवीलाही माहित होत की आपल्या सासुबाईंना कितीही व्यवस्थित काम केल तरी चूका काढण्याची, नाव ठेवायची सवयच आहे. बिचार्‍या राधाकाकूंनाही माहित होता विमलाकाकूंचा स्वभाव पण त्या केवळ सानवीमुळे त्यांच्या घरी काम करत होत्या. राधाकाकूंना माहित होता सानवीचा स्वभाव. त्या दोघींच चांगल सुत जमल होत. तेही खटकतच होत विमलाकाकूंना.
राधाकाकू येतात नाही तोवर विमलाकाकू सुरूच करतात "खुप लवकर आलीस ग राधा...."

"अव्व ताई ऊशीरच झाला बघा आज...थोडी तब्येत बरी नाय बघा, जरा कणकणी आल्यासारख झालेल त्यामुळे ऊठायला ऊशीर झाला."

राधाबाईंना दोन मुल होती. एक मुलगा पाचवीत आणि दुसरा मुलगा पाच वर्षांचा होता. मोठ्या मुलग्याला जरा समजत होत त्यामुळे तो घरी थांबायचा पण लहान  मुलगा राधाबाईंच्या मागे लागून यायचा.

विमलाकाकूंना काही पटायच नाही, मुलाला घरी घेऊन आलेल. त्यांना वाटायच या मुलामूळे राधाबाई काम करण्यात दिरंगाई करतात. सानवीलाही एक चार वर्षांचा मुलगा होता. विमलाकाकू त्यांचा नातू वेदला राधाबाईंचा मुलगा गणू बरोबर जास्त खेळू द्यायच्या नाहीत. त्यांच्या मते, ऊगीच आपला नातू बिघडेल अशा कामवालीच्या मुलाच्या संगतीने......वेद काही खायला लागला की विमलाकाकू राधाबाईंकडे बघून लगेच सुरू करायच्या "आमची मुल बाई खात्या-पित्या घरची, त्यांना पहिल्यापासून कधीच काही कमी पडू दिल नाही आम्ही. आमचे हे (सानवीचे सासरे) पिशव्याच्या-पिशव्या भरून खायला आणतात अजूनही. वेदचा पप्पा तर खूप लाडात वाढला हो." अस म्हणून त्या गणूच्या हातातही काही थोडफार खायला टेकवायच्या. ते त्यांच खायला देण अस असायच की राधाबाईंवर आणि त्या निरागस मुलावर ऊपकार केल्यासारख.

सासूबाईंच अस बोलण सानवीला अजिबात आवडायच नाही पण ती तरी काय बोलणार.....कारण सानवीच लग्न झाल्यापासून सानवीलाही त्या हेच ऐकवत होत्या. कारण सानवीही गरीब घरचीच होती....विमलाकाकूंचा समज असा होता की, आपण श्रीमंत घरातले मग आपल्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नसते याऊलट जे गरीब घरातले असतात; त्यांना दोन वेळच जेवण मिळण मुश्कील मग ही लोक बाकी चांगल-चुंगल खायला तर कुठून खाणार.....त्यामुळे त्यांना अस वाटे की स्वत:च्या मुलाला चांगल-चुंगल खायला मिळाव म्हणूनच राधाबाई मुलाला आपल्या घरी घेऊन येतात.


पाहिला गेलं तर खरी परिस्थिती अशी होती की, राधाबाईंनी त्यांच्या मुलांना खूप चांगल वळण लावल होत. मोठा मुलगा कळता होता; त्याला तर चल म्हटल तरी राधाबाईंबरोबर कुठ जात नव्हता....पण गणू अजून लहान होता, त्यात नवरा दारूडा साहजिकच राधाबाईंना गणूला घरी ठेवल की काळजी वाटे. त्यामुळे कुठेही जाताना त्या गणूला बरोबरच घेऊन जात आणि त्याच्यासाठी खायचा डबाही बरोबर ठेवत. गणूही नावाप्रमाणेच गुणी होता, विमलाकाकूंनी किंवा सानवीने काही खायला दिल तरी घ्यायचा नाही, नको म्हणायचा.....शेवटी त्याची आई घे म्हटल्यावरच घ्यायचा. कधी चुकूनसुद्धा वेदची खेळणी वा अन्य वस्तूंना हात लावत नसायचा. चुकून भूक लागलीच तरी आईने आणलेल्या डब्यात जे काही असेल ते खाऊन शांतपणे बसायचा. सानवीला तर गणूच आणि राधाकाकूंच कौतुकच वाटे....."किती प्रामाणिक आहेत माय-लेकर" अस नेहमी तिच्या मनात येई.

एवढ असूनही विमलाकाकूंना स्वत:चा मोठेपणा असायचा.....ऊलट गणूने त्यांनी दिलेला खाऊ घ्यायला नकार दिला तर त्यांना तो त्यांचाच अपमान वाटायचा. कधी-कधी त्यांचा वेदच गणूचा डबा ओढायचा आणि डब्यातल खाण्यासाठी रडायचा.....हे पाहून पण विमलाबाई परत सुरू करत "अरे तु खात्या-पित्या घरचा आहेस की असलं कुणाचपण-काहीपण कशाला खातोयस?"

राधाबाईंना त्यांच्या अशा बोलण्याच वाईट वाटे पण त्यांचा नाईलाज होता, शेवटी त्या मालक नि आपण नोकर...पण सानवीला हे सर्व खूप खटकायच. ती सासूबाईंच्या वतीने राधाकाकूंची माफी मागे. सानवीला भूतकाळातील गोष्टी आठवत, फरक एवढाच होता की आज तिच्या जागी राधाकाकू होत्या. सानवीला मनातून वाटत की आपला मुलगाही घरातल्या मोठ्या माणसांच अनुकरण करून पुढे जावून असच गरीब-श्रीमंत भेदभाव करायला शिकला तर.....नको देवा ! अस होता कामा नये. त्यासाठी मलाच काहीतरी करायला हव, सासुबाईंचा गैरसमज दूर करायला हवा.....

तर पाहूयात पुढील भागात सानवी कशाप्रकारे आपल्या सासूबाईंचे विचार बदलतेय की विचार बदलण्यात अपयशी होतेय. तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.......

नियमित वाचनासाठी E-mail टाका...म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाचे नोटीफिकेशन मिळेल.

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या 

"रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!


Post a comment

1 Comments

  1. धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल....

    ReplyDelete