आठवणी...


"अग पण एवढ्या लवकर शाळेत जाऊन काय करणार आहेस?" मम्मी

"काय करणार आहे म्हणजे? अग तुला नाही माहित...सर्वात पहिला बेंच पकडायचा आहे मला....आणि पाचवीच्या वर्गाचा नियम आहे की पहिल्या दिवशी जो बेंच पकडला जाईल तोच त्याचा पूर्ण पाचवी होईपर्यंतचा बेंच राहिलं....त्यामुळे मला लवकर जायच आहे....." मी

"अग पण तुझ हायस्कुल तर आज सुरू होणार  आहे मग तुला हे सगळ कस माहीत...." मम्मी

"अग त्यात काय मोठे.......शेजारच्या आठवीतील निशादिदीने सांगितले मला.....बर चल लवकर मला अजून दफ्तर भरायच आहे...."

"बररर बाई तु सगळी तयारी केलीचच आहेस तर जा नीट....अस म्हणून मम्मी मला छान स्माईल देते.

हा माझ्या आठवणीतील शाळेतील पहिल्या दिवशीचा मम्मी आणि माझ्यातील संवाद............जसाच्यातसा नाही पण साधारणत: सारांश हाच......

त्यादिवशी काही वेगळीच हुरहूर होती मनात....खुप भारी वाटत होत कारण मी आता जि.प शाळेत खाली सतरंजीवर बसणार नव्हते तर लाकडी बेंचवर बसणार होते.....घरातील मोठ्या भावंडांकडून खुपवेळा ऐकल होत....'फर्स्ट ईंप्रेशन इज् दी लास्ट ईंप्रेशन'.....त्यामुळे प्रत्येक शिक्षकापुढे अगदी व्यवस्थित दिसायला हव आपण हा मनाने केला निश्चय....बालमनच ते. कधी, केव्हा, कसला निश्चय करेल सांगता येत नाही.....मी सगळी तयारी व्यवस्थित केलेली...दप्तरामध्ये (तेव्हा आम्ही दफ्तरच म्हणायचो नंतर हळुहळू बॅग म्हणायची सवय लागली) सगळ्या वस्तू नीट ठेवल्यात का ते तीन-चार वेळा चेक करून झाल होत....डबा, पाण्याची बाॅटल भरून घेतली होती. नाही म्हणायला शाळा गावातच होती.. घरापासून दिडशे मीटरवर  तरीही डबा घेतला होता.....का तर मनात भिती होती कि आपण सकाळी जो पहिला बेंच पकडू तो दुसर्‍या कोणी घेतला तर....म्हणून निदान पहिल्यादिवशी तरी शाळेत पूर्ण दिवस थांबण्याची तयारी मी केली होती.

तयारी तर झाली होती....एव्हाना सकाळचे दहा वाजून गेले होते....शाळा भरल्याची घंटा साडेअकरा ला व्हायची....घरातले आम्ही चौघेजण होतो पाचवीत जाणारे. मी, संध्या, पल्लवी आणि गणेश. गणेश तर केव्हाच पोहचला होता शाळेत...मग मी, पल्लवी आणि संध्या तीघीही गेलो लवकरच.....तसे आम्ही चौघं चुलत भावंडे पहिलीपासून दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो.....त्यामुळे वर्गात कधी भिती वाटली नाही...

अकरा वाजले तसे शिपाईमामा दार ऊघडायला आले.....आम्ही सगळे विद्यार्थी नवीनच, त्यामुळे सर्वांनीच दरवाज्यासमोर गर्दी केली होती....खुप सारी मुल आली होती...आम्ही गावातील तर होतोच सगळे, आहे असा चौथीचा वर्ग. पण बाहेर गावाहूनही खुप विद्यार्थी आले होते...तसेच काही विद्यार्थी गावातच आपल्या नातेवाईकांकडे शिक्षण घेण्यासाठी आले होते....तशी आमची शाळा होतीच नावलौकिक मिळवलेली....जय भवानी हायस्कुल.....शिस्तप्रिय आणि ऊज्ज्वल भवितव्य घडवणारे विद्यार्थी तयार करणारी.....मुळ म्हणजे याच श्रेय जात ते शिक्षक स्टाफला !

तर आपण कुठे आलेलो.....हा....शिपाईमामाने दरवाजा ऊघडला रे ऊघडला आम्ही सगळे एकमेकांना रेटत पाठीवरची बॅग नीट करत कसबस वर्गात घुसतो....आणि मी इकडेतिकडे कुठेही न बघता पहिल्या बेंचवरच जाऊन बसते.....आणि एकदाचा माझा जीव भांड्यात पडतो.....तो आनंद म्हणजे आजच्या ईंजिनिअरिंगची सीट मिळवण्याएवढाच भासतोय मला.
बर मी फक्त माझा बेंच नाही पकडला तर शेजारच्या मुलींच्या ओळीतील आणखी एक पहिला बेंचपण पकडला....कोणासाठी तर बहिणीसाठी...आम्ही तिघी बहिणी मग एका बेंचवर फक्त दोघीच बसू शकत होत्या....जी राहत होती तीच्यासाठी दुसरा बेंच....काय करणार वडिलांनी पहिल्यापासूनच संस्कार केलेले भावा-बहिणीचा विचार करूनच पुढे जायच...मग तिथे सक्के-चुलत हा फरक करण्याचा तर अजिबातच प्रश्न नव्हता. माझे वडील ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो यांच्या बाबतीत आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे नाती जोडण आणि ती फुलवण शिकाव तर त्यांच्याकडून !

पुढच्या अर्ध्या तासात ग्राऊंडवरती मस्त राष्र्टगीत, प्रार्थना, सुविचार, आजच्या बातम्या, प्रतिज्ञा असा मिळून आमच्यावरती मुल्यशिक्षणाचे संस्कार केले गेले. ज्यामुळे आणखीनच फ्रेश झाले सर्व विद्यार्थी. त्यातील मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रार्थना झाल्यावर रांगेत आपआपल्या वर्गात जाणे. वर्गात जाऊन बसलो तस कधी एकदा क्लासटिचर येतायेत अस झाल...आणि ''गुड माॅर्निंग'' असा एक आवाज वर्गात घुमला....तशी मी भानावर आले...पाहते तर समोर आमचे क्लास टिचर डी.आर.जाधव सर आणि त्या विचारातच मी सगळ्यांबरोबर गुड माॅर्निंग म्हणून प्रतिसाद दिला.

पहिला दिवस म्हणजे अर्थातच ईंट्रोडक्शनचा  दिवस......त्यादिवशी ओळीने सर्व शिक्षकांनी स्वतच नाव, कोणता विषय शिकवणार आहे ते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल नाव, गाव सांगून ओळख करून दिली.....तेव्हा अस वाटत होत की फक्त आपणच नवीन आहोत पण आत्ता समजत आहे की आपल्या एवढेच ऊत्साही आपले शिक्षकही होते आपणाला शिकवायला....पहिल लेक्चर भारी झाल...ईंग्लिश विषयाच. पहिल्यांदाच शिकत होतो आम्ही ईंग्लिश....पण त्यादिवशीपासून तोच विषय माझा आवडता झाला....सरांची कृपा !

मधली सुट्टी झाली....मज्जा आली मैञिणींबर भाजीची वाटणी करून डबा खायला....ओळखीही झाल्या नवीन मुलींशी.....पण सुट्टी संपून शाळेची बेल व्हायला आणी इकडे आमच्या गणेशच आणि वर्गातल्या एका नवीन मुलाच भांडण झाल....मारामारी नाही पण बडबड जोराजोरात....आता भावाच भांडण मग बहीण कशी गप्प बसणार? परत आमच्या आप्पांचे संस्कार जागे झाले नी मी भावाची बाजू घेऊन त्यामुलाशी भांडले....त्या मुलाच नाव डोळ्यासमोर आहे पण आत्ता आठवत नाही....सगळ झाल खर पण तो मुलगा गेला क्लासटिचरला नाव सांगायला.... अस काही घडंल हे आमच्या गावीही नव्हत...स्टाफरूममधून आले की मला आणि माझ्या भावाला आमंञण तेही शाळेच्या पहिल्याचदिवशी.....मग काय ऊभा राहिलो सरांच्या पुढे जाऊन.....दहा-पंधरा शिक्षक होते.....सगळ्यांच्या नजरा माझ्यावर आणि माझ्या भावावर....बर्‍यापैकी सर्वच शिक्षकांना समजल होत की माझ्या भावाने भांडण केल आहे आणि मी त्याची बाजू घेउन भांडले आहे.......चूक कोणाची होती हे जाणून न घेताच....बाकीचे शिक्षकही हसायला लागले मला.....आणि अहो सोनवलकर अस नसत प्रत्येकवेळी आपल्या जवळची व्यक्ती बरोबर असेलच अस नाही......मी मनातून खुप खजील झाले......पण त्यादिवशीपासून आजतागायत मी काहीही, कसलाही प्रसंग घडो आणि कोणीही असो...नेहमी सत्याचीच बाजू घेतली......म्हणतात ना जे होत ते चांगल्यासाठीच होत.....माझ्यामध्ये एक चांगल तत्त्व रुजल गेल तेही कायमचचं.

शेवटचा तास खेळायचा तास होता.....वेळापञक अजून बनवल गेल नव्हत पण मुलांना पहिल्याच दिवशी अडकल्यासारख व्हायला नको म्हणून खेळायला सोडल असाव......काहीही म्हणा आमची शाळा हातीच भारी.....मनात घर करणारी.....शाळा सुटल्याची घंटा होण्याअगोदर पाच मिनीटे 'वंदे मातरम' म्हणने हा शाळेचा नियमही पाळला....आणि आमची शाळा सुटली.....आम्ही तीघीजणी गप्पा मारत घरी कधी पोहचलो समजलच नाही.....घरी आल्यावरती माझ्या चेहर्‍यावरचा ऊत्साह आणि थोडा थकवा मम्मीला दिसला असावा म्हणूनच तिने शेवयाची खीर बनवली आणि मी ती फस्त केली.....शेवटी प्रत्येक आईला आपल्या मुलाचा शाळेतला पहिला दिवस किती महत्त्वाचा असतो ना हे आज प्रकर्षाने जाणवतय स्वत आई झाल्यावर.....

अशी ही माझ्या भावाविषयीची आठवण आजही आठवली तरी मन व्याकूळ होत भावाला भेटण्यासाठी...सध्या दोघांचही लग्न होऊन दोघेही संसारात रमलो आहोत...एकमेकांपासून खूप दूर आहोत...त्यात हा लाॅकडाऊन, कोरोनाच संकट यामुळे भेटता नाही येणार....तसही करीअर, लग्न यांमध्ये बिझी झाल्यापासून खूप कमीवेळा रक्षाबंधन साजरं झालं....पण आम्हा बहिण-भावंडातील नात तितकच दृढ आहे जितक की पाचवीत असताना होत. आजही माझ्या माझ्या भावाला कोणी बोलल तर मला राग येतो आणि माझ मन ऊदास झालेल असलं की हमखास त्याचा फोन येतोच....कदाचित भक्कम नात म्हणतात ते यालाच !

नियमित वाचनासाठी E-mail टाकून subscribe करा.

कथा आवडल्यास like करून comment करा. 

अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव.

©माधुरी दिपक पाटील 

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या "रंग आयुष्याचे" या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा....धन्यवाद!
Post a comment

0 Comments