काय म्हणाव अशा जगण्याला....भाग१


प्रसंग पहिला:-

"अग रखमा आवर पटकन, शेटजींनी लवकर यायला सांगितलय आज शेतावर" दामू

"सांगू द्या की मग...तो शेटजी कधी लवकर ये म्हणत नाय....बारा महिने अठरा काळ तर राबवूनच घेत असतो आपल्याला." रखमा

"रखमे शेटजींबद्दल बोलताना तोंंडाला लगाम ठेवत जा....ते काय आपल्याला बळजबरीने नेत नाहीत, आपण स्वता जातो....."

"मग नगं जायला...दुसर्‍या कोणाच्यातरी बांधाला काम करूया...असपण  किती हाजरी देतो? बाकी शेतकर्‍यांपेक्षा पन्नास रूपये कमीच देतो.....त्याला तरी किती पचतील म्हणा आपल्या कष्टाचे पैसे.....फायदा घेतो तो तुमच्या चांगुलपणाचा, ईमानदारीचा."

"हो त्यांच मीठ खातोय आपण मग ईमानदार नको का र्‍यायला? आज आपल्या घरची चूल पेटतीया, दोन टायमचं जेवण जेवतोय ते त्यांच्या ऊपकारामुळच."

"हो धनी तुम्ही आणं तुमचा शेठ....माझ बोलण लय झोंबत तुम्हासनी...तर का मगआपल्या शेतातल सगळ धान्य तो देत नाही आपल्याला...का व्याज वसूली म्हणून आपल शेत वापरतूया?" अस म्हणून रखमा तावातावाने भाकरी थापुन तव्यावर टाकते आणि भाजलेली भाकरी आणि खमंग पिठल व कांद्याची फोड दामूच्या ताटात वाढते.

दामू "चल मी शेतावर जावून येतो...तूझ गारहाण रोजचच हाय..शेठजी टमाट्याचा यापार करून आल असत्याल...बघून येतो"  अस म्हणत दामू हात धुतो आणि रखमाला "मला यायला तिन्हीसांज व्हईल" अस सांगतो.

रखमा "बर या लवकरशीनंं" अस म्हणत दरवाज्याच्या चोकटीत ऊभा राहून दामूच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहतच "काय वाढून ठेवलय देवानं पुढ्यात कायमायत, शेठची किती आणि केवढा पैसा देतोय का परत ईक्री काय बराबर झाली नाय म्हणतूया कुणास ठाव" मनाशीच बोलून घरात निघून जाते.

रखमा आणि दामू एका गावात राहणार आणि शेतात कष्ट करून जगणार जोडप. मुलबाळ होत नव्हत...त्यासाठी खूप पैसे घालवले पण काही ऊपयोग झाला नाही....याच खर्चासाठी त्यांंनी गावातल्या शेठजीकडून कर्ज काढलं होत. त्या कर्जाची परतफेड होईपर्यंत शेठजीन दामूची जी काही दोन एकर जमीन होती ती स्वतच्या नावावर करून घेतली होती.....दामूने या दिवसापर्यंत कर्ज फेडेन अशी जी काही बोली केली होती; ती संपून गेल्यावर शेठजीन जोपर्यंत तू घेतलेल कर्ज  आणि त्याच व्याज देत नाही तोवर मी तुझ्या शेतात भांडवल गुंतवेन, तू कष्ट कर माणि जे काही ऊत्पन्न निघेल ते वाटून घेऊ अस दामूकडून कबुल करवून घेतल होत. दामू गरीब बिचारा निदान आपल शेततरी आपल्या नजरेखाली राहिल, आपल्या शेतातून आपल्याला ऊत्पन्न घेता येईल, भांडवलाअभावी आपण बरीच पीक शेतात लावू शकत नाही; ती लावता येतील अशा भोळ्या भावनेने दिवस-राञ शेतात काबाडकष्ट करत असतो आणि बरोबर त्याची बायको रखमाही शेतात राबराब राबत होती...रखमाला सगळ कळत होत की शेठजीन कस आपल्या नवर्‍याला अडकवलय आणि कस आपल्याच शेतात आपल्यालाच नोकर बनवून ठेवलय....पण आपण शेठजीच पैसं दिल्याशिवाय काय करू शकत नाही. हेही तिला कळून चुकलेल.

ईकडे दामू शेतात जावून पोहचतो....पाहतो तर शेठजी अगोदरच तिथे हजर असतात.  त्यांच्याबरोबर आणखी कोणीतरी दोन माणस होती. दामू शेठजींना "शेठजी तुमी शेतावर यायची तसदी कशासाठी घेतलीत, मी येतच हुतूकी वाड्यावर"

त्यावर शेठजी मिस्कीलपणे हसत "नाही म्हणल एक चक्कर टाकून यावी, तू काय काय आणि कशी मशागत केलीयस...टोमॅटो काढून नेल्यापासून आलोच नव्हतो ईकड."

दामू "बर झाल शेठजी येण केल, अहो ते टमाट्याचा यापार करून बी लय दिस झाल बघा....जरा त्या व्यावराचं पैस मिळाल असत तर बर झाल असत...जरा अडचण हुती घरात राशन माल भरायचा हूता."

शेठजी दामूच बोलण ऐकून न ऐकल्यासारख करतो....त्याच्याबरोबर आलेल्या दोन माणसांना तो शेताकडे हातवारे करून काहीतरी दाखवत होता.

आपल्या बोलण्यावर शेठजी काहीच बोलले नाहीत, कदाचित त्यांना ऐकू गेल नसाव...म्हणून दामू परत एकदा शेठजींना आवाज देतो...तर शेठजी जरा खेकसतच बोलतात, "हो जरा थांब द्यायच्यात... तुझे पैसे कुठे पळून नाहीत चालले."

शेठजींचा रागीट सूर ऐकून दामू बिचारा शांतच बसतो...कारण शेठजींबर दोन अनोळखी लोकही होते, त्यांच्यासमोर शेठजी अस बोलल्यामुळे दामू जरा ओशाळतो. दामू एवढा भोळा होता की त्याला शेठजींना प्रतित्तर द्याव असही नाही वाटल. एवढच काय तर बाबा आपल्याच शेतातील ऊत्पन्नाच्या पैशासाठी आपणच हात पसरायचे असा विचारही त्याच्या मनात दूरवर कुठे आला नाही. ...त्याच्या मनात एकच कुतूहल येत की ही माणस कोण आहेत नि शेठजी यांना आपल शेत का दाखवत आहेत...

एव्हडयात शेठजींची हाक येते, "दामू हे घे तुझे पैसे.....यावेळीपण आपल्या मालाला पुरेसा दर भेटला नाही बघ."

दामू निराश होतो....कारण त्याला एका दुसर्‍या शेठजीकडून टोमॅटोचा वेगळाच भाव समजला होता....आणि त्याप्रमाणे म्हटल तर त्याला त्याच्या शेठजीने जेवढे पैसे दिल्यात त्याच्या तिप्पट पैसे द्यायला हवे होते......तो काय बोलणार एवढ्यात शेठजी त्याला ऊद्या भेटूया म्हणून त्या दोन माणसांना घेऊन निघून जातो. दामू त्याच्या शेतात आलेल्या पीकावर नजर फिरवून तसाच घराची वाट धरतो....


घरी रखमा वाटच पाहत बसलेली...आपला नवरा तीन्हीसांज झाल्यावर येतो म्हटलेला मग लवकर कसा आला? समद ठीक हाय नव्ह? असे विचार तिच्या मनात डोकावतात....दामू घरात येतो; रखमाकडे न पाहताच खाली अंथरलेल्या गोधडीवर बसतो....नवर्‍याचा पडलेला चेहरा पाहून रखमा समजायच ते समजून जाते....ती तर पहिल्यापासूनच दामूला सांगत असते की आपण शेठजीच काम सोडूया, तो आपला फायदा घेतोय....पण दामू मानायला तयार नव्हता...आणि कसा सोडून देईल चाकरी? त्यांच शेत शेठजीच्या ताब्यात होत....

रखमा दामूजवळ बसते व त्याला धीर देते, "तुम्ही मनाला लावून घेऊ नका. शेठजीन आजवर आपल्याला आपल्या कामाचा पुरा मोबदला कधी दिला नाय....मग आज एवढ का तोंड पाडलया"

"काय नाय ग पण ह्या येळला लयीच कमी दिलीया आणि त्या दुसर्‍या रामाशेठजीला मी बाजारभाव इचारला तर त्यो म्हणला की म्यापण टमाटर इकून आलोय पण भाव लय बेस्ट भेटलाय...मग शेठजी आपल्याबर अस का वागल्यात....आणि अग रखमे त्यांच्या बराबर दोन माणस हूती....त्यासनी शेठजी आपल शेत दाखवत हुत....का काय मायत पण माज्या मनाला इगळीच हूरहुर लागून राहिलीय...."

"अग बायो....हे काय सांगतायसा...ती दोन माणस आपल्या शेतावर कशापायी आलती? त्यो शेठजी आपल रान-बिन तर इकणार नाही नव्ह त्या माणसांसनी? नाय बयो एवढ कष्ट केलय त्या रानात आणि मी बरी इकून दिल त्याला.."

"काय रखमे तुझ तोंड हाय का गटारखाना...चांगल बोल. आपल्या शेताला काय बी करणार नाही शेठजी."

"नाय धनी तुम्ही शेठजीवर एवढं दिवस इस्वास ठेवला त्येच लय चूकल...त्यान आपल रान स्वताच्या ताब्यात घेतल तवाच आपण जाग व्हहायला पाहिजे होत....तुम्ही आजवर लय गप बसवलं मला पण आपण ऊद्याच शेठजीला जाब ईचारूया..."

दामू हळू आवाजातच "मला तर काय समजना...बघू ऊद्या काय होतय ते"

राञभर दामू आणि रखमाला झोप येत नाही...दोघेही हाच विचार करत असतात की, ऊद्या शेठजीकड जावून काय आणि कस बोलायच? आपण शेठजीला जाब विचारू शकू ना? शेठजी तयार व्हतील का आपल रान आपल्याला द्यायला? आणि नाही म्हणले तर...तर कस व्हणार आपल? असे एक ना अनेक प्रश्न दामू आणि रखमाच्या मनात येत होते....कधी एकदा सकाळ होतेय नि आपण शेठजीकडे जातोय अस झालेल दामू-रखमाला.

सकाळी-सकाळी ऊठून ती दोघ शेठजीच्या वाड्यावर जातात...शेठजी नुकतेच झोपेतुन ऊठलेले.....अचानक रखमा आणि दामूला अस पाहून ते आश्चर्यचकित झाले नाहीत ऊलट त्यांना या या बसा ....लवकर येण केलत अस म्हणून बसायला सांगितल आणि नेहमीप्रमाणे मिस्किलपणे हसत "काय काम काढल दामू? तुझे पैसे तर कालच दिले मग आज घरी येण्याच कारण काय?" अस म्हणतच शेठजीने पाण्याने चूळ भरली.

"पण शेठजी, ते शेजारच रामाशेठजी म्हणत व्हत कि भाव लय मिळालाय मग मला तुमी एवढच पैस कस दिल?" भितभीतच दामू बोलतो.....पण आपल्या नवर्‍याने भिऊ नये म्हणून रखमा दामूच्या प्रत्येक  वाक्याला हो हो करत होती...

"अस तर....तुम्ही यासाठी आलाय...बर मग मी बोलतोय ते ऐका.....जेवढे काही पैसे दिल्यात ना तेवढेच घेऊन चूपचाप बसायच...जस आजपर्यंत बसलाय. यावर मला आणखी काय बोलायच नाही....तुम्ही जावू शकताय."

शेठजीच अस रागाने बोलल्याने दामूला तर समजतच नाही काय बोलाव....त्यातुन पण जरा धीर करत रखमा पुढ होऊन "अव पण शेठजी आमी आमच्या हक्काच अन आमच्या शेतातलं मागतूया"

शेठजी "ए रखमे तु लय शहाणी बनू नको....दामू आणि मी बघून घेईल."

आपल्या बायकोवर ओरडलेल बघून दामू पुढे होतो कारण त्याच्या मते पुरूषांनी स्ञीयांवर ओरडून स्वतचा पुरूषार्थ कधीच गाजवायचा नसतो.

दामू "तुमी मला काय बी बोला पण रखमाला काय बोलू नका....हो अन मला पैसं नगा देऊ पण माझ शेत मला द्या.....तुमच सगळ कर्ज अन याज(व्याज) बी फेडन."

शेठजी हसतच "काय शेतं देऊ?....दिल की मग कालच....सौदा केला शेताचा. काल ती दोन माणस आलती त्यांंना देऊन टाकल सगळ शेत...."


दामू खालीच कोसळतो, "काय माज शेत..." म्हणजे त्या दोन माणसांना पाहून दामूच्या मनात चुकचूकलेली पाल बरोबर होती तर...

रखमा दामुला आधार देत "शेठजी तुमी हे लय चूकीच केलात बघा...आमाला न इचारताच अस करयला नक हुत.....आमच शेत आमाला मागारी द्या."

शेठजी "गपगुमान ईथन चालत व्हा....तुमासनी काय बी मिळणार नाय...आन तुमाला जे करायचय ते करा. तुमासनी आता त्या शेतात पाऊल बी ठेवता यणार नाय...."

दामू गच्च भरलेल्या डोळ्याने जमीनीकड पाहत बसलेला असतो...रखमा त्याला हलवून "अव तुमी बोला की कायतर....शेठजीला समजावा की..." पण दामू काहीच बोलत नाही.

शेवटी रखमाच "पण शेठजी आमच्या रोजगाराच काय? आमी आमच्या शेतात राबून कसतर दोन येळच जेवत हुतू "

शेठजी "आता ते तुमच तूमी बघा....दुसर्‍याच्या शेतात जावून करा काम..चला मला शहरात जायचय....तुम्ही निघा" अस म्हणून शेठजी घरात निघून जातो.

रखमा व दामू माञ तिथच मातीत बसून असतात...रखमा डोळ्यातली आसव पुसून तोंडाला पदर लावते व दामूच्या हाताला धरून त्याला ऊठवते....दोघेही तिथून निघतात. जाताना त्यांच स्वतच पण आता शेठजीन विकुन दुसर्‍याच झालेल शेत लागत. दामू क्षणभर थांबतो व शेतात जावून त्या धरणीमातेच्या पाया पडतो. शेतातली माती ऊचलून कपाळाला लावतो व एवढावेळ रोखून धरलेल्या आसवांना वाट मोकळी करून देतो. रखमा कशीबशी स्वतला सावरत दामूला घरी घेऊन जाते आणि घरातल सगळ सामान बांधायला घेते....दामू स्तब्धच असतो; काय बोलणार होता तो? ज्या शेठजीवर स्वतपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यानच विश्वासघात केला.....बायकोन कितीवेळा समजावूनही ऐकल नाही आणि आता आयुष्याची मिळकत असलेली शेती गमावून बसला होता...शेठजी प्रत्येकवर्षी ऊत्पन्नाचा करत असलेला व्यवहार कधी शहानिशा करून पाहिला नाही...व शेठजीवर आंधळा विश्वास ठेऊन, डोळ्यावर पट्टी बांधून शेतात राबराब राबत बसला होता.

रखमा सगळ आवरून दामूला चला म्हणते. दामू बांधून ठेवलेली सामानाची गाठोडी ऊचलतो व दोघे त्या घरातून कायमचच बाहेर पडतात आणि गावाबाहेर  जायचा रस्ता धरतात....तो रस्ता त्यांना कुठे घेऊन जाणार, हे त्यांनाही माहीत नव्हत....सगळ गमावून पुन्हा पोटासाठी....त्यांना माहीत नसलेल्या रस्त्याची वाट धरायची होती.

पुढील भागात प्रसंग दुसरा व तिसरा पाहूया....तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...वाचकहो तुमच्या प्रतिक्रिया मुळेच लिहायला प्रोत्साहन मिळत.....धन्यवाद!

©माधुरी दिपक पाटील

अशाच कथा/लेख वाचण्यासाठी माझ्या रंग आयूष्याचे या फेसबुक पेजला लाईक करा.

Post a comment

1 Comments